घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना

Update: 2021-11-04 01:37 GMT

मुंबई // कोरोना योद्ध्यांनी आतापर्यंत लोकांना लसीकरण केंद्रात आणण्याची त्यांना लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे त्यासाठी आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, अशी सूचना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरणाचा काल आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी दूरचित्र संवादाद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला. यावेळी देशात लसीकरण धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे.

लसीकरणाला गती मिळण्यासाठी लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे हे सांगताना कोरोना योद्ध्यांना त्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा लागेल. जनजागृतीसाठी स्थानिक धार्मिक नेत्यांचीही मदत घेता येईल. त्यांची दोन मिनिटांची चित्रफीत बनवून लोकांना संदेश देता येईल अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

Tags:    

Similar News