पुजा चव्हाण प्रकरणी पुण्यात खटला दाखल: ५ मार्च रोजी येणार न्यायालयाचे आदेश

राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सोमवार पासून सुरु होत असताना वनमंत्री संजय राठोड प्रकरणात रोज नव्या नव्या गोष्टी पुढं येत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पुण्यामध्ये खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. येत्या ५ मार्च रोजी या खटल्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश येणार आहेत.

Update: 2021-02-26 13:44 GMT

७ फेब्रुवारी रोजी टिकटॉक स्टरा पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर राज्याभर खळबळ उडाली होती.

प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी पुढं आल्या असून आत्तापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील जाहीर आक्रमक पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीसांच्या तपासावर

प्रश्न उपस्थित केला आहे. घटनेच्या जवळपास ३ आठवड्यांनंतर देखील पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्यामुळे त्याविरोधात आता पुण्यात थेट न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत भक्ती राजेंद्र पांढरे यांनी अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे. युक्तिवादानंतर याचिकेवर निर्देश देण्यासाठी ५ मार्च तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

'प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. पूजाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. तरीदेखील त्याचा सखोल तपास होत नसून आरोपी कधीही मृत्यूबाबतचे पुरावे नष्ट करू शकतात', असं देखील याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

बदनामीमुळे पूजाचे कुटुंबीय व्यथित

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे पूजाचे कुटुंबीय व्यथित झाले आहेत. "पूजाची बदनामी थांबवा नाहीतर आत्महत्या करावी लागेल", अशी व्यथित प्रतिक्रिया पूजाच्या वडिलांनी दिली आहे. तसेच, "कोणताही पुरावा नसताना फक्त फोटो जोडून त्यावरून रोज नवीन चर्चा केली जात आहे", असा देखील आरोप त्यांनी केला आहे.

Tags:    

Similar News