पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करणार

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Update: 2021-07-26 11:22 GMT

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वारणा नदीकाठच्या 27 गावांना महापुराचा मोठा तडाखा बसला आहे. तर वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी, तांदुळवाडी, चिकुर्डे, एतवडे , नागठाणे गावांना देखील मोठा फटका बसला आहे.

या महापुरामुळे पाझर तलाव तसंच डावा कालवा फुटला आहे. शेतजमिनीची माती पिकांसह खरडून गेली आहे. छोट्या - छोट्या गावांना जोडणाऱ्या पूल देखील या पुरात वाहून गेले आहे. कुसाईळवाडी, दुरंदेवाडी, शिराळा , कापरी येथील पुल देखील वाहून गेलेत. वारणा नदीकाठचे देवाडी, सागाव मांगले, कणदूर, पुनवत, बिळाशी , कोकरूड , नाठवडे, चरण, मनदुर, मराठेवाडी, आरळा आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोल्हापूर , शाहुवाडी , पन्हाळा या गावांना जोडणाऱ्या पुलांचे नुकसान

बिळाशी-भेडसगाव, चरण-सोंडोली, आरळा - शित्तुर, कोकरूड-रेटरे , सागाव- सरूड , मांगले - काखे ही वारणा नदीवरील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणारी पूल आहेत. या पुलांचे मोठे नुकसान झाल्याने कोल्हापूर , शाहुवाडी , पन्हाळा येथील वाहतूक बंद झाली होती. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे साधारणत: 15 जनावरे वाहून गेली आहेत. या ठिकाणच्या नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे गेले चार - पाच दिवस लोकांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला होता. पूरग्रस्त गावातील खबरदारी म्हणून पाण्याखाली गेलेल्या घरातील लोकांचे साधारणता 2200 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मराठेवाडीमध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याने त्या ठिकाणचे प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वारणा मोरणा नदीस आलेल्या महापुरामुळे शेतीचे तसेच भात, सोयाबीन, नाचणी, ऊस, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करणार

शेतातील पाणी कमी ओसरल्यानंतरच शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मोरणा धरण सांडवा जवळील शेती पिकांसह वाहून गेली आहे. जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. तालुक्यातील रस्ते व पूल यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे एस. टी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तालुक्यात पावसाची उघडीप असली तरी चांदोली येथे पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान जिल्ह्यात 86 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणातून 14630 क्युकेसने विसर्ग सुरू आहे. धरणात 31.26 टी.एम.सी पाणीसाठा आहे. तर चांदोली धरणात 34 टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:    

Similar News