ऑडिट होऊनही पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन गळती

Update: 2021-06-09 16:30 GMT

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असताना आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Hospital) वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची घटना घडली आहे. ऑक्सिजन पुरवठा करताना टँकच्या व्हॉल्व मध्ये बिघाड (Oxygen tank safety tank leak) झाल्याने बुधवारी (दि. 9) ही घटना घडली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी व्हॉल्व बंद केला. सध्या कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नक्की काय घडलं?

वायसीएम मध्ये सध्या 300 कोरोना व म्युकोरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयातील ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन टँकद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. 30 आयसीयू बेड व 100 ऑक्सिजन बेडला पुरवठा करणाऱ्या ऑक्सिजन टॅंकमध्ये बिघाड आला.

टॅंक मध्ये ऑक्सिजन भरताना अधिक प्रेशर दिल्याने व्हॉल्व लीक झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. रुग्णांना त्वरित दुसऱ्या ऑक्सिजन टॅंक मधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान आयुक्त राजेश पाटील यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. ऑक्सिजन व्हॉल्वची बदली करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

ऑडिट होऊनही गळती

नाशिक येथे ऑक्सिजन गळतीची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर शहरात आशा घटना घडू नयेत म्हणून ऑक्सिजन टँकचे ऑडिट करण्यात आले होते. मात्र, तरीही ऑक्सिजन गळती झाली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकचे आयुक्त यांच्याशी आम्ही बातचीत केली असता राजेश पाटील यांनी टँक मध्ये ऑक्सिजन पुरवठा करत असताना अधिक प्रेशरने व्हॉल्व लीक झाला. त्यामुळे ऑक्सिजन गळती झाली. मात्र, दुसरा व्हॉल्व असल्याने त्यामधून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. सध्या सर्व सुरळीत आहे.

Tags:    

Similar News