सरकारमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा

Update: 2019-12-30 17:03 GMT

उध्दव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. या विस्तारात राष्ट्रवादीने जुन्या आणि अनूभवी नेत्यांना संधी दिली आहे. त्याउलट शिवसेनेनं रामदास कदम,दिवाकर रावते अनूभवी नेत्यांना दूर सारत नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. जनतेपर्यंत पोहचणारी खाती राष्ट्रवादी काँग्रेसने पदरात पाडून घेतल्यामुळे या सरकारवर राष्ट्रवादीची छाप राहणार हे स्पष्ट झालंय.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रशासनात नवे आहेत. विधानसभेत मी नवा असल्याचा आणि प्रशासनातील बारकावे समजून घ्यायचे असल्याचं त्यांनी वेळोवेळी मनमोकळपणाने स्पष्ट केल. त्यामुळे प्रशासनाचा गाडा हाकतांना उध्दव ठाकरे सरकारची खरी धुरा राष्ट्रवादीच्या हाती असणार आहे. गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेला कमी आणि तशी दुय्यम मंत्रिपद मिळाली होती. मात्र रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारख्या आक्रमक शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत,पक्षाच्या व्यासपीठावर शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडली. या मंत्र्यांमुळे शिवसेनेला सत्तेत राहूनही विरोधीपक्षाची भूमिका बजावता येणं शक्य झालं होतं.

यावेळी दिवाकर रावते, रामदास कदम यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय. जुन्या नेत्यांपैकी केवळ सुभाष देसाई यांना मंत्रिपद दिलं गेल. मात्र देसाईंचा स्वभाव मुळातच आक्रमक नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनूभवी मंत्र्यापुढं टिकाव धरणारे आणि त्याचं आक्रमकतेनं उत्तर देणारे सक्षम मंत्री शिवसेनेकडे नाही. दूसरिकडे कॉँग्रेसने बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत या अनूभवी मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय. मात्र थोरात यांना प्रशासनाचा अनूभव असला तरी स्वभावाने आक्रमक नसणारे थोरात मंत्रिमंडळात तितकासा प्रभाव पाडू शकलेले नाही. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. डॉं नितीन राऊत आक्रमक आहेत.यापुर्वी मंत्रिमंडळात असतांना त्यांनी मंत्रिमंडळात अजित पवारांच्या दादागीरीला उत्तर दिलं मात्र त्यानंतर त्यांना आलेला राजकीय अनूभव बघता. यावेळी ते आक्रमक राहणार का हा प्रश्नच आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्येक फोटोमध्ये अजित पवार दिसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधीत्व जनतेपुढं प्रभावी पध्दतीने जाणार आहे. हे लक्षात आल्य़ामुळेच काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली. मात्र ती धूडकावून लावण्यात आली. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेस हायकमांडने अंतिम क्षणी अशोक चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला.

सरकार चालवतांना मंत्रिमंडळापुढं अनेक आव्हान येत असतात. या सरकारमध्ये तिन्ही पक्षात अनेक विषयावर टोकाची मतभिन्नता आहे. त्यामुळे दररोज अडचणींचे प्रसंग येणार आहे. यातून मार्ग काढायला अनुभव आणि प्रशासनाकडून काम करुन घेण्याची हातोटी लागते. हीच परिस्थिती राष्ट्रवादी कॉँग्रेससाठीची मोठी सुवर्णसंधी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राज्याचं अर्थकारण, शेती, ग्रामिण भागाची उत्तम जाण असणारे, प्रशासनावर कमांड असणारे नेतृत्वाला राष्ट्रवादीने या मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतलंय. दूसरिकडे जनतेत प्रभाव पाडणारी गृह, अर्थ, गृहनिर्माण, जलसंपदा, सामाजिक न्याय यासारखी महत्वाची खाती राष्ट्रवादीने स्वताकडे घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आपला पक्षाचा बेस मजबूत करु शकतात.

राष्ट्रवादीचे हे मातब्बर मंत्री

अजित पवार- प्रशासनावर हूकमी कमांड असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये अजित पवारांचा समावेश असतो. आक्रमकपणे सत्ता राबवून घेणे, कार्यकर्त्याला उभं करण्यात त्यांचा हात कुणी धरु शकत नाही.

छगन भुजबळ- या सरकारमधील सर्वात जास्त अनुभवी मंत्र्यांत भुजबळ आहेत. भुजबळांचा ओबीसी बेस अजूनही मजबूत आहे. विरोधीपक्ष नेतेपद, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकामसारखी महत्वाची खाती त्यांनी हाताळल्याने,त्यांना प्रशासनाची जाण आहे.

दिलीप वळसे पाटील- उच्चशिक्षीत असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी महत्वाची खाती हाताळली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल काम केलं. उत्कृष्ट संसदपटू आणि विविध विषयांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. विधानसभेत नियमांवर बोट ठेवणारा मास्तर म्हणून त्यांचा धाक आहे.

जयंत पाटील- उच्चशिक्षित असलेले जयंत पाटील यांची मतदारांसोबत प्रशासनावर उत्तम मांड आहे, त्यांना राज्याच्या अर्थकारणाची समज आहे, प्रतिमा स्वच्छ आहे. विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांवर आक्रमक उत्तर न देता विनोदातून चिमटे घेण्याची त्यांची हातोटी आहे. ग्रामविकास, अर्थ,गृहसारखी खाती सांभाळल्याने त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे.

Similar News