भाजपच्या सांगण्यावरुन रश्मी शुक्लांकडून बेकायदा फोन टॅपिंग- राष्ट्रवादी

Update: 2021-03-23 07:36 GMT

पोलीस दलात बदलीचे रॅकेट चालवले गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांचे हे सर्व आऱोप फेटाळले आहेत. गुप्तचर विभागाने दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटमधील अहवालातील खोटी माहिती असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना उत्तर दिले.

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग (PhoneTapping) बेकायदा होते, तसेच त्यांनी भाजपला मदत करण्यासाठी हे फोन टॅपिंग केले असाही आरोप मलिक यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला ते भाजपसाठी काम करत असल्याने त्यांनी खोटे आरोप केल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नसल्याने फडणवीस हे खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी चुकीचे काम केल्याने त्यांना शिक्षा म्हणून बदली करण्यात आली असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

गुप्तचर विभागाच्या यादीतील अधिकाऱ्यांची बदलीच नाही?

पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट उघड करुन रश्मी शुक्ला यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी डील झाल्याचा आरोप केला होता. तसेच अशा अधिकाऱ्यांची यादी दिली होती. पण या यादातील एकाही अधिकाऱ्याची बदली झाली नाही, असे स्पष्ट करत मलिक यांनी हे सर्व भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

Tags:    

Similar News