एकत्र निवडणुका लढण्याच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीची सावध भूमिका?

एकत्र निवडणुका लढण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वेगळीच भूमिका मांडल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

Update: 2021-06-19 07:37 GMT

राज्यातील आगामी निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील असे संकेत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिले होते. पण त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील असे सामनातून सांगण्यात आले आहे. पण निवडणुकांना अजून तीन वर्ष आहे आणि त्यावर आता भाष्य करणं हे काही शहाणपणाचे नाही, असे पटेल यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

सामनामध्ये काँग्रेसचे प्रभारी एस. के. पाटील यांचे वक्तव्य आले आहे. पण हे सगळे निर्णय 2023 नंतर होतील म्हणूनच मी सांगितलं यावर आता भाष्य करणे योग्य नाहीये आणि जे कोणी भाष्य करत असतील त्यांनाचा विचारा, असेही पटेल यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री कुणीही होऊ शकते. ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील आणि ज्या पक्षाला पाठिंबा लोकांचा असेल त्या पक्षाने कुणाला मुख्यमंत्री करावे हा त्यांचा अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले. पण आज स्थिती स्पष्ट आहे बहुमत हे महाविकास आघाडी सरकारकडे आहे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि आता जागा रिकामी नाहीय, असा टोलाही त्यांनी लगावला. पक्ष वाढवण्याकरिता किंवा पक्षाची भूमिका माडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आज आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत त्यामुळे आम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Full View

Tags:    

Similar News