पालिका अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस, कोरानामध्ये १०० कोटींचा घोटाळा...

Update: 2023-01-13 15:53 GMT


मुंबईतील विविध भागात मुंबई महानगर पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत मुंबई महापालिकेतील एक उच्च अधिकाऱ्यावर ईडी कडून नोटीस बाजवण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. हा संपूर्ण घोटाळा १०० कोटींचा असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या घोटाळ्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती सोमय्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

कोरोनाच्या काळात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट पालिकेकडून देण्यात आले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. तसेच यामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून कामे केली. ही कंपनी नविन असल्याचे आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएमआरडीए चे अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला यापुढे कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असे आदेश असताना सुद्धा पालिकेने या कंपनीचे काम सुरु ठेवल्याचा आरोप सोमय्यांनी लगावला. आणि या कंपनी व भागिदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये तक्रार केली. यासंदर्भात ऑगस्ट २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आता या गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

या संदर्भात मुंबई महानगर पालिकेकडे माहिती आणि कागदपत्रे मागितली असता, पालिकेने ती देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर आता पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी ईडीने पाचारण केल्याचा दावा किरीट सोमय्याने केला आहे.

नेमके हे प्रकरण काय आहे? त्यावर एक नजर टाकूया...

कोरोना काळात विविध कंपन्यांना मुंबईतील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचे काम दिले होते. त्यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा व उपकरणे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. त्याचप्रमाणे हे कंत्राट मिळवण्यासाठी वरील कंपनीने बनावट कागपत्रे मुंबई महानगर पालिकेकडे सादर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदारांच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना २०२० मध्ये करण्यात आली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा, राजू साळुंखे या कंपनीचे भागीदार आहेत. या कंपनीकडे कोविड सेंटर सांभाळण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसणे, ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टरची नेमणुका करणे. त्यामुळे कंत्राटातील अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करुन २५ लाख रुपये अनामत रक्कम जप्त केली.

Tags:    

Similar News