केवळ मानवतेच्या आधारावर अमिताभ गुप्तांनी वाधवान यांना पत्र दिलं - गृहमंत्री

Update: 2020-04-27 01:37 GMT

विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी केवळ मानवतेच्या आधारावर वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचं पत्र दिल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधू लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचले होते. विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला होता. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पत्र देण्याबाबत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे तसेच याचा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

वाधवान कुटुंबीयांचा क्वारंटाईनचा कालावधी आज पूर्ण झाला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपील वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिलं आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना होम क्वारंटाइन केलं असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Similar News