'भाजपाच्या नेत्यांनी केदारनाथला जाऊन शांत बसण्याची गरज' , खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना शांतपणे केदारनाथला जाऊन महिनाभर बसण्याची गरज आहे. त्यांची डोकी थंड झाली, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Update: 2021-12-31 04:36 GMT

मुंबई // शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. आणि त्यानंतर सुरू झाला भाजपा आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा. दोन्ही बाजूंनी सातत्याने दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात त्याचबाबत पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे. भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.

"सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतली आणि बाहेरची भाषणं मी पाहातो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचं ते ठरवलंय", असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, "कधी राष्ट्रवादीबरोबर तुम्हाला जावंसं वाटतंय. कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्याचं म्हणता. कधी अजून काय म्हणता. या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना शांतपणे केदारनाथला जाऊन महिनाभर बसण्याची गरज आहे. त्यांची डोकी थंड झाली, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. असा टोला राऊत यांनी लगावला.

Tags:    

Similar News