मुंबईत ऑफिस 24 X 7 करण्याचा विचार, मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्ताची दखल

Update: 2020-09-29 13:32 GMT

कोरोनाच्या संकटामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. पण आता ही लोकलसेवा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सामान्यांसाठी खुली करण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर लोकल आणि बसेसमध्ये गर्दी होणार नाही यासाठी ऑफिसेसची वेळ दिवस-रात्र करण्याचाही विचार सरकार करत आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहे.

मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्ताची दखल

मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी १२ जून २०२० रोजी लिहिलेल्या 'गर्दीवर उपाय काय मायबाप सरकार, यावर विचार करा… ' या अग्रलेखात सरकारने कोरोनाच्या संकटातून काय धडा घेतला पाहिजे आणि मुंबईसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचे विश्लेषण केले होते.

सरकारने कार्यालयीन वेळांची पुनःआखणी करणे. मुंबईचे काही टप्पे करावेत, जसं चर्चगेट ते महालक्ष्मी, महालक्ष्मी ते दादर, दादर ते वांद्रे. या टप्प्यांमधल्या कार्यालयीन वेळेत अर्धा-पाऊण तासांचा फरक करावा. त्यामुळे सकाळचा पीक टाइम विभागला जाईल.

मिनिटां-मिनिटांची लढाई तास-अर्धा तासावर जाईल. पाळ्यांमध्ये कामकाज चालवणं, जेणेकरून कर्मचारी वर्गावर प्रवासाचा जास्त ताण येणार नाही. एकाचवेळी जवळपास संपूर्ण मुंबई कामावर निघते त्याएवजी ही गर्दी तीन पाळ्यांमध्ये विभागली जाईल, असे उपायही सुचवले होते.

या लेखाची संपूर्ण लिंक खाली दिली आहे. एकूणच सरकारने कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी या उपायांचा विचार सुरू केला आहे, हे मॅक्स महाराष्ट्रच्या भूमिकेचे यशच म्हणावे लागेल.

गर्दीवर उपाय काय मायबाप सरकार, यावर विचार करा… – रवींद्र आंबेकर

Similar News