मंगेशकर कुटुंबियांनी राम कदम यांना तोंडघशी पाडले

शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करणाऱ्या भाजप नेते राम कदम आणि काँग्रेसला मंगेशकर कुटूंबियांनी तोंडघशी पाडले.

Update: 2022-02-11 03:24 GMT

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्यात त्यांच्या स्मारकावरून नवा वाद पेटला होता. भाजप आमदार राम कदम आणि काँग्रेसने लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर बनवण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र या मागणीला मनसे, वंचित बहूजन आघाडी यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यावर मंगेशकर कुटुंबियांनी आता प्रतिक्रीया दिली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनेही लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे, असे मत व्यक्त केले होते. मात्र त्यावर मनसेने शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक बांधण्यावर जोरदार आक्षेप घेतला. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कला मैदानच राहू द्या, स्मशानभुमी बनवू नका, अशा शब्दात लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कवर स्मारक बांधण्याला विरोध दर्शवला होता. तर वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक बांधण्याला विरोध केला होता. त्यानंतर आता मंगेशकर कुटूंबियांकडून प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, लता दीदींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र दरम्यान यावर वाद सुरू आहे. परंतू मंगेशकर कुटूंबियांनी या वादात पडण्याचे कारण नाही. कारण दीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे ही आमची इच्छा नाही. त्यामुळे स्मारकावरून सुरू झालेला वाद कृपया थांबवावा, असे मत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

तसेच राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर दीदींनी संगीत विद्यालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत दीदींच्या नावाने संगीत विद्यालय सुरू करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे दीदींच्या संगीत स्मारकापेक्षा कोणतेही मोठे स्मारक असू शकत नाही, असे मत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

मात्र भाजपनेते राम कदम आणि काँग्रेसने लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे अशी मागणी केली होती. मात्र आता लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करू नये. त्यांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे, अशी आमची इच्छा नाही, असे मत व्यक्त केल्याने भाजप नेते राम कदम आणि काँग्रेस तोंडाघशी पडली आहे.

Tags:    

Similar News