घोषणांचा पाऊस, कुठे पडेल कुणास ठाऊक? चित्रा वाघ यांची अर्थसंकल्पावर टीका

Update: 2020-03-07 07:47 GMT

महिलांसाठी आशादायी अर्थसंकल्प असल्याबाबत सुप्रिया सुळे, चारूलता टोकस आणि रूपाली चाकणकर या महाविकास आघाडीतील नेत्यांनी समाधान व्यक्त केले असताना, घोषणांचा पाऊस, कुठे पडेल कुणास ठाऊक? अशा शब्दांत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

महिला वर्गासाठी पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करण्यापेक्षा आहेत त्या पोलीसस्टेशनमध्ये प्राधान्याने संवेदनशिलतेने महिलाप्रश्न सोडवले जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं मत त्यांनी मांडलं आहे.

अर्थमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पोलीस स्टेशन आणि महिला आयोगाचे कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. सरकारचे हे पाऊल अतिशय सकारात्मक व महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.याबद्दल सरकारचे मनापासून आभार

- सुप्रिया सुळे, खासदार

राज्यातील महिला सुरक्षेची सद्यस्थिती लक्षात घेऊन ठोस उपाययोजना आणि त्यासाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र सरकारने पूर्णपणे अपेक्षाभंग केलेला आहे. विभागीय आयुक्तस्तरावर महिला आयोगाची कार्यालयाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महिला आयोगासाठीच्या आणखी आवश्यक असलेल्या सक्षमीकरणाचे काय? महिला सक्षमीकरण, सबलीकरण यासाठीची दृष्टी या संकल्पात दिसत नाही, हे दुर्दैवी आहे, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

तृतीयपंथीयांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दादांनी केली.हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. मुख्य प्रवाहातून दूर लोटलेला वर्ग यामुळे पुढे येण्यास यामुळे मदत होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाची कार्यालये स्थापणार. सॅनिटरी नॅपकिनच्या नवीन मशीनसाठी, अनुदानित नॅपकिनसाठी १५० कोटींची तरतूद. तसेच महिला धोरणाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. महिला बचत गटांना गतिमान करण्यासाठी १००० कोटींची खरेदी बचत गटांमार्फत करणार. महिला सुरक्षा, सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार नेहमी कटिबद्ध आहे. - रुपाली चाकणकर, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

प्रत्येक जिल्ह्यात सर्व महिला अधिकारी व कर्मचारी असणाऱ्या किमान १ महिला पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात येणार मात्र याची गरजच काय? याचा सामान्य, पिडीत महिलांना काय उपयोग? असा सवाल करीत चित्रकला वाघ म्हणतात की आहेत त्या पोलीसस्टेशनमध्ये महिलाप्रश्न प्राधान्याने संवेदनशिलतेने सोडवले जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

प्रथमच महिला व बालकांसाठी 'जेंडर अँड चाईल्ड बजेट'ची संकल्पना राबविणाऱ्या सरकारचे अभिनंदन! राज्यातील प्रत्येक वर्गाचा विचार करत सर्वसमावेशक व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मांडण्यात आलेला अर्थसंकल्प. हिंगणघाट जळीत कांडाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलां करिता विशेष महिला पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक विभागात महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. निर्णयाचे स्वागत! - चारुलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस

अर्थसंकल्प नव्हे हे तर जाहीर सभेतील भाषण !! कोणतीही ठोस आकडेवारी नाही आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषणही नाही. या अर्थसंकल्पात तरतुदींबाबत जसा भौगोलिक असमतोल आहे, तसा महिलांचे प्रश्न आणि त्या संबंधीची सोडवणूक करण्यासाठीच्या तरतुदीबाबतही आहे, अशी थेट टीका वाघ यांनी केली आहे.

Similar News