महाराष्ट्र आणि पं. बंगालला CAA, NRC विरोधाचा फटका? दोन्ही राज्यांचे चित्ररथ रद्द

Update: 2020-01-02 11:41 GMT

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्र आणि पं. बंगालच्या चित्ररथांना केंद्र सरकारनं परवानगी नाकारलीये. त्यामुळे आता यावरुन शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्राचा चित्ररथ रोखून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे, असा सवाल विचारलाय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय. महाराष्ट्राचा चित्ररथ रोखला तरी राज्यातील भाजप नेते गप्प का? असा सवाल त्यांनी केलाय. हे काँग्रेस (Congress) राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने (BJP) बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?,” असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या विषयावर महाराष्ट्रानं चित्ररथाच्या देखाव्याचा प्रस्ताव दिला होता. पण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं हा प्रस्ताव नाकारलाय. तर पश्चिम बंगालच्या कन्या योजनेवरचा प्रस्तावही नाकारण्यात आलाय.

Similar News