भाजपच्या राज्यात असाही 'गुरू सन्मान'! ; भावी शिक्षकांवर लाठीचार्ज केल्याने भाजपवर जोरदार टीका

Update: 2021-12-05 03:12 GMT

लखनऊ  :  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर पोलिसांनी लाठीमार करण्यात आला आहे. शनिवारी, रात्री बेरोजगार विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. दरम्यान पोलिसांनी त्यांना अटकाव करण्यासाठी थेट लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपवर सडकून टीका होत आहे. या मुद्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

लखनऊत शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या जवळपास एक हजार बेरोजगार तरुणांकडून मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी तेथे पोलीस दाखल झाले. त्यांनी या बेरोजगारांना अटकाव केला. मात्र, त्यानंतरही भावी शिक्षक मेणबत्ती मोर्चावर ठाम होते. दरम्यान आंदोलक युवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या बेरोजगारांकडून राज्यात 69 हजार शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावे. त्याशिवाय आणखी 22 हजार जागांवर शिक्षक भरती करावी या मागण्या करण्यात आल्या.

पोलिसांच्या या कारवाईवर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात भावी शिक्षकांवर लाठीमार करून 'विश्वगुरू' होण्याचा मार्ग प्रशस्त केला जात असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव ट्विट करत केली. सोबतच त्यांनी लाठीचार्जचा व्हिडीओ देखील पोस्ट केला.

तर आम आदमी पक्षानेही पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. सरकारने बेरोजगार तरुणांवर लाठीमार करताना एक गोष्टी लक्षात घ्यावी की तरुणांनी भाजपला सत्तेत बसवले. त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा तुमच्या सत्तेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकणार असल्याची टीका खासदार संजय सिंग यांनी केली.

दरम्यान पोलिसांच्या या कारवाईने विरोधकांना भाजप सरकारवर टीका करण्यासाठी एक संधी मिळाली आहे. दरम्यान भाजपच्या राज्यात हाच का 'गुरू सन्मान'? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News