कायद्याने वागाचा दिवे उपक्रमास सविनय असहकार !

Update: 2020-04-05 12:08 GMT

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजता लोकांना दारात दिवे पेटवण्याचं आवाहन केलेलं असलं तरी टाळी-थाळी आंदोलनाप्रमाणे लोकांनी या आवाहनाला सहज प्रतिसाद दिलेला नाही. ठोस उपाययोजना सोडून मोदी भलताच वेळकाढूपणा करताहेत, अशी टीका त्यांच्यावर चहुबाजूंनी होतेय. महाराष्ट्रातील कायद्याने वागा लोकचळवळीने दिवे उपक्रमास सविनय असहकार करण्याचं आवाहन लोकांना केलंय.

कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांच्या म्हणण्यानुसार, जनता कर्फ्यूच्या वेळी संकटकाळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू सांगितला गेला होता. तेव्हा देशाने मोदींच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसादही दिला. राजकीय पक्षही विचारभेद विसरून सहभागी झाले. पण आता यावेळी लोक दिवे उपक्रमावर विवेकाने विचार करताहेत. देशाची एकजूट दाखवण्यासाठी असे उपक्रम राबवत असतानाच समांतर पातळीवर कोरोना प्रतिबंधात्मक ज्या ठोस उपाययोजना देशपातळीवर व्हायला हव्या होत्या, त्या होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे वेगवेगळे उपक्रम राबवून मोदी फक्त स्वत:वर फोकस करून घेताहेत आणि लोकांचं लक्ष सरकारच्या अपयशावरून भलतीकडे वळताहेत, असं म्हणायला वाव आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीने सविनय असहकाराचं पोस्टर बनवलं असून ते समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. राकेश पद्माकर मीना यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की दिवे इव्हेन्टला सविनय असहकार हा निव्वळ विरोध नसून कोरोनासंदर्भात आरोग्यस्तरावर मूलभूत सुविधांची पूर्तता झाली पाहिजे, या मागणीसाठीची जनजागृतीसुद्धा आहे. म्हणूनच आम्ही ट्रीटमेंट हवी, इव्हेन्ट नको असा नारा दिलाय.

Similar News