नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी, पोलीसांकडून ईसीएल कंपनीच्या चार अधिकार्‍यांची चौकशी

Update: 2023-08-09 03:14 GMT

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या गुन्हयाच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनीच्या चार अधिकार्‍यांची आज रायगड पोलीसांकडून चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी आणलेली माहिती अपूर्ण असल्याने त्यांना 11 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

 

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपच्या केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर के बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे.

 

याबाबत या कंपन्यांकडून विविध मुद्यांवर माहिती रायगड पोलिसांनी मागविण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी कंपनीचे व्यवस्थापक संचालक फणीद्रनाथ काकरला आणि इतर तीन पदाधिकारी खालापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे सहा पर्यंत अशी नऊ तास चौकशी करण्यात आली.

 

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विक्रम पाटील, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार या अधिकार्‍यांनी चौकशी केली. नितीन देसाई यांचे काका श्रीकांत देसाई हे सुध्दा चौकशीला हजर होते. पोलिसांनी संबधीत कंपनीच्या कागदपत्राची पडताळणी केली. मात्र पोलिसांनी मागितलेल्या माहिती अपूर्ण असल्याने पुन्हा नोटीस बजावली आहे.

 

यासर्वांना आता पुन्हा सविस्तर माहितीसह ११ ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असल्याचे माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News