'पप्पा कधी येईल?' या मुलीच्या सततच्या प्रश्नाने नैराश्य आलेल्या आईने मुलीसह केली आत्महत्या

Update: 2021-10-04 03:57 GMT

कोरोनाने पतीचे निधन झाल्यानंतर मुलीच्या सततच्या 'पप्पा कधी येईल?' या प्रश्नांने आलेल्या नैराश्यातून आईने मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. सुजाता प्रविण तेजाळे आणि अनया प्रविण तेजाळे असं आत्महत्या केलेल्या माय लेकीचे नाव आहे. राहत्या घरात गळफास घेत या माय लेकीने आपलं जीवन संपवले आहे. यावेळी त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. ज्यात पाच महिन्यांपुर्वी पती प्रविण तेजाळे यांचे कोरोनाने निधन झाले, एकट्याने राहणं कठीण झालं असून 7 वर्षाची चिमुरडीच्या दररोजच्या 'पपा कधी येईल " या प्रश्नाने नैराश्य आल्याचे सुजाता यांनी लिहीलं आहे.

अनयाला बऱ्याचदा समजावून सांगितल्यानंतर काही दिवस शांत राहल्यानंतर तीने पुन्हा तोच प्रश्न सुरू केल्याचे सुजाता यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, तिच्या सततच्या प्रश्नांवर 'तुझे पप्पा स्टार होऊन आकाशात गेले आहेत', अशी समजूत सुजाताने काढली. त्यावर अनयाने आपण पण पप्पांसारखं स्टार होऊ असं म्हटल्याने अखेर नैराश्यातून आपण हे पाऊल उचलत असल्याचे सुजाता तेजाळे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकच्या विनय नगर येथील सुखसागर अपार्टमेंट येथील राहत्या घरी गळफास घेऊन या माय लेकीने जीवन यात्रा संपवली. या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे, याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News