Parth Pawar: अजितदादा शरद पवारांशी काय बोलले?, जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

Update: 2020-08-12 19:19 GMT

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तर दुसरीकडे राम मंदिराचे भूमिपूजन कोरोनाच्या संकटाच्या काळात करु नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली असताना पार्थ पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जय श्रीरामचा नारा देत भूमिपूजनाचे समर्थन केले होते. पार्थ पवार यांनी या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या भूमिका जाहीरपणे मांडल्यानं पक्षांतर्गत मतभेद समोर आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली...

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं होतं. “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत का? अशी चर्चा सुरु झाली असताना आज अजित पवार यांनी तात्काळ शरद पवार यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही... मात्र, बैठकीला उपस्थित असलेले जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना...

“या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंबीय यांच्यात कोणताही वाद नाही. शरद पवार आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि वडिलांच्या नात्यानं ते आम्हाला सल्ले आणि सूचना करत असतात. आम्हाला त्यांचं मार्गदर्शनही मिळत असतं’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

पार्थ पवार यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार का?

“पार्थ पवार यांच्याकडून पक्षाला कोणतंही स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांनी कोणतीही मागणी केली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला पक्षाशी जोडण्याची गरज नाही,” असं मत पाटील यावेळी व्यक्त केलं’’.

Similar News