Amravati | सत्ताधारी भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले - यशोमती ठाकूर
सत्ताधारी भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केल्याचा आरोप माजी मंत्री, कॉंग्रेस नेत्या यशोमती यांनी केली भाजप सत्तेत नसता तर त्यांची संख्या आणखी कमी झाली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमरावती | नगरपालिका निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडे शासन, प्रशासन, पैसा आणि सत्तेची ताकद असूनही दमदाटी व अरेरावी करून निवडणुका जिंकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप जितका आव आणतो, तितकी त्यांची प्रत्यक्ष ताकद नाही, हे या निकालांवरून स्पष्ट झाल्याचं माजी मंत्री, कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
अमरावती जिल्ह्यात सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले असले तरी अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपला अपयश स्वीकारावं लागल्याचं त्यांनी नमूद केलं. सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून न आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे भाजप सत्तेत नसता तर त्यांची संख्या आणखी कमी झाली असती, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.
दरम्यान, अंजनगाव सुर्जी येथील मतमोजणीत बदमाशी करून भाजप विजयी झाल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावरून केला आहे. मतमोजणीची मागणी होत असताना निवडणूक अधिकारी चहा प्यायला उठून जात असल्याचा दावा त्यांनी केला. अंजनगाव सुर्जी निवडणुकीत सत्ताधारी भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.