CoronaVirus - होम कॉरेन्टाईन असणारे कसे ओळखणार? मुंबईत 4 व्यक्तींना पकडले

Update: 2020-03-18 16:07 GMT

परदेशातून भारतात परतलेल्या किंवा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला १४ दिवस होम कॉरेन्टाईन करून घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. होम कॉरेन्टाईन असणारे व्यक्ती घराबाहेर पडू नयेत, लोकांमध्ये मिसळू नयेत आणि यांची ओळख पटावी म्हणून मुंबई महापालिकेने यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा स्टॅम्प मारण्यास सुरूवात केली आहे.

मात्र, १४ दिवस घराबाहेर पडू नयेत अशा स्पष्ट सूचना असूनही काही लोकं प्रवास करत आहेत. बुधवारी सकाळी वांद्रे-दिल्ली या गरीब रथ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या अशाच चार लोकांना रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतलं. पालघर स्टेशवर या चारही व्यक्तींना थांबवून त्यांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द कऱण्यात आलं आहे.

या घटनेबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना वेस्टर्न रेल्वेचे पीआरओ रविंद्र भाकर म्हणाले, “बुधवारी पालघर स्टेशनवर हातावर कोरोनासंदर्भातील होम कॉरेन्टाईनचा स्टॅम्प असलेले चार जण आढळून आले. ते वांद्रे-दिल्ली असा प्रवास करत होते. या चारही जणांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलंय.”

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या संशयित प्रवाशांना पालघर ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या चारही प्रवाशांचे नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सौजन्य : माय मेडिकल मंत्रा

Similar News