जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस; तितुर डोंगरी नदीला पूर

Update: 2021-09-26 03:51 GMT

जळगाव : जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने चाळीसगावमधील तितुर डोंगरी नदीला मोठा पूर आला. त्यामुळे चाळीसगाव शहरातील दोन्ही पुलांवरून पाणी वाहत आहे. परिणामी या पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जुन्या गावातून नव्या गावाकडे येण्यासाठी शहरातील नागरिकांना तब्बल आठ कि.मी. फेरी मारून यावं लागत आहे. पाऊस असाच राहिला तर नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा तितुर डोंगरी नदीला मोठा पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून याचा व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरत असल्याने नवीन माल भरावा की नाही. असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान चाळीसगाव शहरातील ॲक्सिस बँक अद्याप सावरलेली नाही , आठ दिवसात दोन वेळा ॲक्सिस बँकच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने बँकेचे मोठे नुकसान झालं आहे. त्यातच सततच्या पावसामुळे पुन्हा बँकेत पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान पावसामुळे शिवाजी घाटावरील व्यावसायिकांनी आपल्या मालाची आवरा आवर केली आहे.

Tags:    

Similar News