जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस, अनेक गावांमध्ये पाणी शिरले

Update: 2021-09-07 14:04 GMT

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जामनेरमध्ये पुरामुळे घरं, शेती वाहून गेली आहे. जामनेर तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कान, वाघूर उंबर नदीला पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे ओझर गावात पाणी शिरलं आहे.



भागदरा गावामधील अनेक घरांवरील पत्रे उडाली असून, उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरले आहे. गावाजवळ असलेला तलाव देखील फुटल्याने गावात पाणीच पाणी झाले आहे. रस्ते देखील वाहून गेले असून शेतांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.



जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्या व नाल्यांना पूर आले असून, काही गावांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले होते. चाळीसगाव तालुक्यात तर पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही पूरपरिस्थिती ओसरत नाही तोच आठवडाभरात पुन्हा एकदा याठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.



तितुर आणि डोंगरी नदीला पूर आला आहे. पारोळा अमळनेर तालुक्यात ही जोरदार पाऊस झाला असून बोरी नदीला पूर आला आहे नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे 10 दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस लक्षात घेता धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. वाघूर धरणही 90 टक्के भरलं असून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरली असून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

Tags:    

Similar News