न्यायाधीश रोहित देव यांचा तडकाफडकी राजीनामा

Update: 2023-08-04 09:38 GMT

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित बी देव यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे देव यांनी न्यायालयाचं कामकाज सुरू असतानांच राजीनामा दिल्याची घोषणा केलीय. यावेळी देव यांनी कुणाचंही मन दुखावलं असल्यास त्याबद्दल माफी मागितलीय. २०१७ साली देव यांची न्यायाधीश या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

अर्बन नक्षल प्रकरणातील प्रा. जी.एन.साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी संबंधित खटल्यातून ज्या घटनापीठानं निर्दोष मुक्तता केली होती, त्या घटनापीठाचे रोहित देव हे सदस्य होते. या घटनापीठाचा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १० ऑगस्टपासून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली जाणार आहे.

२०१७ मध्ये नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या रोहित देव यांचा सेवाकाळ हा ४ डिसेंबर २०२५ पर्यंत शिल्लक होता. मात्र, त्याआधीच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

आज न्यायाधीश रोहित देव यांनी न्यायालयाचं कामकाज सुरू असतांनाच कोर्टात राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्यांची माफीही मागितली. आपण सर्वांनी इथं काम करतांना खूप मेहनत घेतलीय. तुमच्या कुणाविषय़ी पण माझ्या मनात राग किंवा भावना नाही. तरीही अनावधानानं कुणी दुखावलं गेलं असेल तर त्यासाठी मी माफी मागत असल्याची भावना न्यायाधीश रोहित देव यांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News