'... तर मी सायनाईड खाऊन जीव देईल आणि त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील'

Update: 2020-05-30 01:39 GMT

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दानवे यांनी मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी सायनाईडच्या गोळ्या खाऊन जीव देईल आणि त्याला पूर्णपणे रावसाहेब दानवे जबाबदार असतील असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.

जाधव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या १९ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी सासरे दानवे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. रावसाहेब दानवे हे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिलीय.

जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती आणि पत्नी संजना या राजकीय वारसदार असतील असं सांगितलं होतं. जाधव यांच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून कलह सुरू होता. त्यांच्या निवृत्तीमागे कौटुंबिक कारण असल्याच्याही चर्चा होत्या. त्यांच्या पत्नीने त्यांच्या आईविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

मात्र, आता या व्हिडीओनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. याबाबत रावसाहेब दानवे यांच्याकडून अद्यापपर्यंत कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Similar News