लिंगायत मठाच्या प्रमुख पुजारी पदी मुस्लिम तरुण

Update: 2020-02-20 08:35 GMT

कर्नाटकमध्ये एका लिंगायत मठाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका मुस्लिम तरुणाला लिंगायत मठाचा प्रमुख पुजारी म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ३३ वर्षांचे दीवान शरीफ रहमानसाहब मुल्ला २६ फेब्रुवारीला पदग्रहण करणार आहेत.

लहानपणापासूनच आपण लिंगायत संप्रदायाचे संस्थापक संत बसश्वेवर यांच्या विचारांनी प्रभावित झाल्याचे दीवान शरीफ रहमानसाहब सांगतात. १२व्या शतकात संत बसवेश्वर यांनी लिंगायत संप्रदायाची सुरूवात केली होती. कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील आसुति गावात मुरूगराजेंद्र कोरानेश्वर शांतीधाम हा मठ आहे.

या मठासाठी दीवान शरीफ रहमानसाहब यांच्या वडिलांना २ एकर जमीन दान केली होती. कलबुर्गीमधील खजुरी गावात असलेल्या ३५० वर्ष जुन्या कोरानेश्वर संस्थानच्या अंतर्गत हा मठ येतो. या निर्णयाबद्दल खजूरी या मुख्य मठाचे पुजारी मुरूगराजेंद्र कोरानेश्वर शिवयोगी म्हणतात, की “आम्ही अनुयायांच्या जात आणि धर्माचा विचार करत नाही.

संत बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात सामाजिक न्याय आणि सद्भावनेचा जे स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांच्या शिकवणुकीचं पालन करत आम्ही मठाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले केले आहेत. मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्याआधी तीन वर्षांपासून शरीफ यांनी सर्व पैलूंचा अभ्यास पूर्ण केला आहे” असंही त्यांनी सांगितले आहे.

Similar News