विदर्भात महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल...!

Update: 2024-03-26 17:12 GMT

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून महायुतीच्या वतीने पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur loksabha Constituency) भाजपचे उमेदवार (BJP Candidate) सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून हा अर्ज दाखल करण्यात आला.

अर्ज दाखल करण्यापुर्वी विजय संकल्प सभेचे आयोजन

सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीच्या वतीने विजयी संकल्प यात्रा काढण्यात आली. यानिमित्त बोलताना मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार टीकेची झोड केली. त्यानंतर या रॅलीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांसह मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला.




 

संकल्प सभेत काय म्हणाले मुनगंटीवार?

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या छोटेखानी संकल्प सभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मी घरून निघतानाच देवाचा आशिर्वाद घेऊन आलोय. परंतु ज्यांच्या नावामध्येच देव आहे, असे आपल्याला आशिर्वाद द्यायला आले असतील तर या जगात मला कोणीही पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे बंधुनो मला ही निवडणूक माझी नसून तुमची आहे असं वाटतं. म्हणून ठरवलं आहे, हरलो तर खचायचं नाही आणि जिंकलो तर माजायचं नाही. दरम्यान, मुनगंटीवार असंही म्हणाले की, मी घाई गडबडीत या मंचावर आलोय, चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर पाय आपटू नका. तुम्ही पाय आपटले तर निवडणूकीत आपटायची वेळ येईल.




 

मुनगंटीवरांची काँग्रेसवर जोरदार टीका

आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर आयोजित केलेल्या विजयी संकल्प सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पत्रकारांच्या मते निवडणूक ही दोन मुद्यांच्या आधारे लढवली जात आहे. ज्यामध्ये प्रामु्ख्याने जात अग्रस्थानी आहे. जातीच्या नावाखाली जर कुणी प्रचार करत असेल, तर तो आपल्या पायावर धोंडा मारून घेणार. या मतदारसंघात सर्व जातीधर्माचे लोक आहेत. त्यामुळे मी प्रत्येक जातीच्या लोकांची सेवा करणार असल्याचं यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, मुनगंटीवार असंही म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवारासोबत माझी लढाई नसुन ही लढाई विकासाबद्दल असणार आहे. समोरचा उमेदवार यांनी आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत काय दिवे लावलेत हे सांगितले पाहिजे. सत्तेमध्ये असताना किती झोपा काढल्या हेही सांगायला पाहिजे, काँग्रेस कुंभकर्णापेक्षाही पुढं आहे. कुंभकर्ण सुध्दा म्हणत असेल की, काँग्रेसवाले तर माझेही बाप निघाले, मी तर फक्त सहा महिने झोपायचो हे तर वर्षभर झोपतात. असं म्हणत मुनगंटीवारांनी काँग्रेसवार जोरदार टीकेची झोड केली आहे. 




 


Tags:    

Similar News