फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड

Update: 2019-09-22 17:16 GMT

लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत 77 वर्षीय दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो?

दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो 1983 ते 2007 या काळात ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु असले, तरी पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने स्वतंत्र ठसा उमटला.

‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य

आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा

ओअॅदसिसच्या शोधात

तेजाची पाऊले (ललित)

नाही मी एकला

संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास

सुबोध बायबल – नवा करार

सृजनाचा मोहोर

परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)

ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)

मुलांचे बायबल (चरित्र)

ख्रिस्ती सण आणि उत्सव

पोप दुसरे जॉन पॉल

सुनील गोसावी,

संस्थापक-सचिव

Similar News