महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Update: 2020-01-02 15:43 GMT

वर्धा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कारंजा, आर्वी आणि देवळी तालुक्याच्या काही भागात जोरदार पावसासोबतच गारपीटही झाली आहे. आर्वी आणि कारंजा तालुक्यात १० ते १५ गावामध्ये बोराच्या आकाराची गार पडली. यामुळे शेतीपीक आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेत. देशात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात नागरिक व्यस्त असताना नेहमी प्रमाणे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतात नागरिक आनंद करण्यात तल्लीन असताना मध्य रात्री धुवांधार पावसाने सुरवाती पासूनच आपला कहर दाखविण्यास सुरुवात केली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल घास हिरावला आहे. सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक खराब झाले आहे. चणा, तूर व गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अवकाळी आलेल्या गाऱ्यांसह वादळी पावसाने संत्रा झाडे सुध्दा पार कोलमडल्यानं शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. त्यात अचानक आलेल्या कडाक्याच्या गारव्याने सर्वत्र गारठा निर्माण झाला आहे.

आर्वी शहरात व परिसरातील ग्रामीण भागात तर सर्वांचीच बिकट परिस्थिती आहे. शहरात तर मोठमोठ्या गारांसह पाऊस पडलाच .परंतु येथून 3 कि. मी. अंतरावर असलेल्या खडका-शिरपूर या परिसरात तर रस्त्यावर काश्मीर, हिमाचल प्रदेशात असलेली बर्फाळ परिस्थिती निर्माण झाली. तेथील सर्वच शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. काहींनी कापसाचे ढिगारे शेतातच झाकून ठेवले. तर काहींनी तूर सोंगुन ठेवली होती. गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे.

सुनील भिमराव सोनवणे या 40 वर्षीय शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या 4 एकर शेती मध्ये हरभरा, तूर, व गव्हाची लागन केली होती. ते संपूर्ण पीक जवळ जवळ वाया गेले आहे. गारांच्या पावसानं त्याच्या शेतात मोठं नुकसान झालं आहे. या गारा इतक्या मोठ्या होत्या की, जवळ जवळ आठ तास विरघळल्या नव्हत्या. अशीच काहीशी परिस्थीती सध्या विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये देखील आहे. अगोदर झालेल्या परतीच्या पावसानं महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यातच आता अवकाळी पावसानं देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या पावसाची नुकसान भरपाईच अद्यापपर्यंत मिळालेली नसताना आता अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे.

त्यामुळं आता शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे मंत्री मंडळातील सदस्य खातेवाटपामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं राज्यातील मंत्र्यांचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Full View

Similar News