माजी गृहमंत्री अनिल देशमुख केईएम रुग्णालयात दाखल

Update: 2022-05-27 12:31 GMT

कथित १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआय कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांचा रक्तदाब वाढला आहे, तसेच, त्यांची स्ट्रेस थिलियम हार्ट टेस्ट करायची असल्याने त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अलिकडेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची परवानगी ईडी कोर्टात मागितली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने (PMLA) ही विनंती फेटाळून लावली होती. खासगी रुग्णालयाऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाचे होत. विशेष म्हणजे ईडीने अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास विरोध केला होता. देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. जेजे रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत, असा अहवाल ईडीने कोर्टात सादर केला होता.

कथित १०० कोटी वसुली आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने आता माफीच्या साक्षीदारासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. आज छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर अनिल देशमुख यांना ऑर्थररोड कारागृहातून केईएम इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News