शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अधिवेशनात कोविड पॉझिटिव्ह

Update: 2021-12-28 06:50 GMT

 विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन सुरु असताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने आता उपस्थितांची चिंता वाढली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वर्षाय गायकवाड म्हणतात, मला आज सकाळी कळलं की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.

विधीमंडळ आधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ३० ते ३५ जणांचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव आल्याचे स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोविड नियमांचे पालन विधीमंडळात होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

राज्यात काल कोरोनाच्या १,४२६ नव्या बाधितांची नोंद झाली. तर ७७६ रूग्ण करोनामुक्त झाले. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७.६६ टक्के झाला आहे. काल कोविडमुळे राज्यात २१ रूग्णांच्या मृत्युची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात काल दिवसभरात ३० पेक्षा जास्त ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यात मुंबईत ११ नवे रूग्ण तर रायगडमध्ये ५, ठाणे पालिकेत ४ रूग्ण, नांदेडमध्ये २ रूग्ण आणि नागपूर, पालघर, भिवंडी, निजामपूर महापालिका आणि पुणे ग्रामीण या भागांमध्ये प्रत्येकी एका ओमायक्रॉन बाधित रूग्णाची नोंद झाली आहे. त्यापैकी २४ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर दोन जण त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्ती आहे.

Tags:    

Similar News