पुणे-मुंबई दरम्यान ई बससेवा, दसऱ्यापासून नियमित फेऱ्या

Update: 2021-10-14 07:50 GMT

पुणे : इंधनाचे वाढते दर आणि इंधन तुटवडा यावर आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. सरकारने देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये खासगी वाहनांसह सार्वजनिक वाहतुकीसाठीही आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सुरूवात झाली आहे. मुंबई ते पुणे दरम्यान आता इलेक्ट्रिक बससेवेला सुरूवात झाली आहे. इलेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनी EveyTrans प्रायव्हेट लिमिटेडने बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर या बसेसच्या नियमीत फेऱ्या सुरू होणार आहेत. EVey ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविरहित प्रवासाचे करता येईल असे EveyTrans चे महाव्यवस्थापक संदीप रायजादा यांनी सांगितले. "भारतामध्ये आंतर-शहर ई-बस सेवा सुरू करण्याचा आम्हाला अभिमान आहे, पुरीबसची सेवा एका चार्जिंमध्ये 350 किमीपर्यंत जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. 



 


शून्य-उत्सर्जन असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये 45 प्रवाशांसह दोन चालक बसू शकतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायक अशा सीट या बसमध्ये असतील. त्याचबरोबर प्रवाशांना वायफाय सुविधेसह यूएसबी चार्जरचीही सोय कऱण्यात आली आहे. भारतात ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ही अशा बस तयार करते. या बसेसमध्ये अनेक सुरक्षा प्रणाली समाविष्ट कऱण्यात आल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे पॅनीक अलार्म सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या EveyTrans कंपनीतर्फे सुरत, सिल्वासा, गोवा, देहरादून यासह इतर काही शहरांमध्ये ई-बस सेवा पुरवली जात आहे.

Tags:    

Similar News