सिद्धगडावर दीपोत्सव साजरा हुतात्म्यांना आदरांजली

Update: 2019-10-29 14:03 GMT

ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांचे वारसदार नाहीत. मात्र आपण देखील त्यांचे वारसदारच आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. म्हणून दरवर्षी सिद्धगडाची पवित्र भूमीवर दिवाळीत दीपोत्सव केला जातो अशी भावना भरत भगत यांनी व्यक्त केली. कर्जत तालुक्यातील देशप्रेमाने भारावलेले तरुण दरवर्षी दिवाळी सण सिद्धगड येथे जाऊन परिसर दिव्यांनी उजळवून करतात. यावेळी उपस्थित तरुणांशी भरत भगत यांनी संवाद साधला.2 जानेवारी 1943 रोजी आजाद दस्त्यातील क्रांतिकारकांवर ब्रिटिशांनी अमानुष गोळीबार केला. त्यात या स्वातंत्र्य संग्रामातील भाई कोतवाल व हिराजी पाटील शाहिद झाले. भारतमातेच्या या दोन सुपुत्राना हौतात्म्य प्राप्त झाले. देश स्वतंत्र झाला. मात्र या क्रांतिकारकांची कायम आठवण राहावी या करिता मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे 2 जानेवारी रोजी शासकीय आदरांजलीचा कार्यक्रम करण्यात येतो.

मात्र तरुणांना या हुतात्म्यांचे स्मरण कायम राहावे म्हणून ही घटना याची देही याची डोळा पाहणारे आजाद दस्त्यातील क्रांतिकारक भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत यांनी सिद्धगडावर दिवाळीत दीपोत्सवाचा निर्धार केला. गेली पाच वर्षे दिवाळीत सिद्धगडची पवित्र भूमी शेकडो दिव्यांनी लक्ख उजळून निघते आहे. केवळ कर्जत तालुक्यातूनच नव्हे तर मुरबाडमधील तरुण यात आपला सहभाग नोंदवत आहेत. दरवर्षी अनेक तरुण घरातील दिवाळी सण असताना देखील सिद्धगडावर दीपोत्सवाला येतात. यापुढे मी असेन नसेन पण ही सुरू झालेली परंपरा भावी पिढीने आत्मसात केली आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. असे दीपोत्सवावेळी बोलताना भगत यांनी सांगितले. बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला सिद्धगडावरील हुतात्मा स्तंभ व येथील माळ शेकडो दिव्यांनी लक्ख उजळला होता. उपस्थित तरुणांनी यावेळी देशभक्तीपर गीते, पोवाडा गाऊन स्वातंत्र्य संग्रामातील घटनेला उजाळा दिला.

Full View

Similar News