बंगळुरात दिग्विजय सिंग यांचं धरणं ; काॅंग्रेस आमदारांच्या भेटीचा आग्रह

Update: 2020-03-18 07:39 GMT

काँग्रेसचे नेते व राज्यसभेचे उमेदवार दिग्विजय सिंग बंगळुरात पोहोचले आहेत. बंगळुरूमध्ये काँग्रेस आमदारांना भाजपाने डांबून ठेवले असल्याचा दिग्विजय सिंह यांचा आरोप आहे. आपण आपल्या आमदारांना भेटायला आलो आहोत, असं सांगून दिग्विजय सिंग यांनी बंगळुरात धरणे धरले आहे. पोलिसांनी त्यांना आमदारांना भेटण्यापासून रोखलं आहे.

पोलिसांनी मला हवं तर एकट्याला आमदारांपर्यंत घेऊन जावं. मला त्यांना भेटायचं आहे. त्यांची खुशाली पहायची आहे. आमदारांनासुद्धा माझ्याशी बोलायचं आहे. आमदारांना पोलीस बळावर जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आलं आहे. त्यांना सरकारविरोधात जाण्यासाठी करोडोंची आमिषे दाखवली जात आहेत, असा आरोपही दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

आपण राज्यसभेचे उमेदवार असून येथे डांबून ठेवण्यात आलेले आपल्या पक्षाचे आमदार आहेत. राज्यसभेची 26 मार्चला निवडणूक आहे, त्यामुळे मी आमदारांना भेटायला आलो आहे. मी गांधीवादी आहे. माझ्याकडे कोणतेही शस्त्र नाही की हत्यार नाही, त्यामुळे पोलिसांनी मला आमदारांपर्यंत घेऊन जायला कसलीही अडचण नाही, असं म्हणत दिग्विजय सिंग यांनी आमदारांना भेटण्याचा आपला आग्रह कायम ठेवला आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्यावर पोलिस ऐकत नाहीत असं दिसून आल्यावर दिग्विजय सिंग यांनी आता बंगळुरात रस्त्यावरच ठाण मांडले आहे.

Similar News