IPSMF ची आयकर विभागाकडून चौकशी, DIGIPUBकडून निषेध

Update: 2022-09-09 13:28 GMT

स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्र, द वायर, प्रिंट यासारख्या डिजिटल माध्यमांना मदत करणाऱ्या Independent and Public-Spirited Media Foundation (IPSMF) या संस्थेच्या बंगळुरू इथल्या कार्यालयात आयकर विभागाने जाऊन चौकशी केली आहे. स्वतंत्र पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या स्वतंत्र माध्यमांना मदत करणाऱ्या IPSMF कार्यालयात आयकर विभागाच्या टीमने अनेक तास चौकशी केली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या फोनची देखील तपासणी करण्यात आली.



 



युट्यूबने मॅक्स महाराष्ट्रचे चॅनेल बंद केले त्याच दिवशी IPSMF, CPR आणि Oxfam India या तीन संस्थांवर आयकर विभागाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान IPSMF संस्थेने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. फाऊंडेशनला परदेशातून आणि काही राजकीय पक्षांकडून निधी मिळाला असल्याचे वृत्त काहींनी दिले होते, त्याबाबत स्पष्टीकरण देताना संस्थेने कधीही परदेशातून देणगी घेतलेली नाही, तसेच संस्थेचे सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर संस्थेने केवळ माध्यम संस्थांना निधी दिला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर IPSMF स्वतंत्र आणि लोकाभिमुख पत्रकारिता करणाऱ्या माध्यमांना यापुढेही मदत करण्याची मोहीम सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान डिजिटील मीडियामधील संघटना DIGIPUBनेही या कारवाईचा निषेध केला आहे. IPSMF, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि ऑक्सफॉम इंडिया या संस्था जनहितासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आयकर विभागाकडून कोणत्याही ठोस पुराव्याविना जनहिताची पत्रकारिता करणाऱ्या माध्यमांना मदत करणाऱ्या संस्थांना त्रास दिला जात आहे, अशी परखड टीका DIGIPUB द्वारे करण्यात आली आहे. स्वतंत्र माध्यमांवरील कोणताही हल्ला हा देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असेही DIGIPUBने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशा कारवायांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ तर कमजोर होतोच पण सरकार स्वतंत्र माध्यमांबाबत काय धोऱण राबवते आहे हे देखील स्पष्ट होते आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News