१२ ते १४ वर्षांच्या आतील मुलांच्या लसीकरणाची तारीख ठरली?

Update: 2022-01-17 12:10 GMT

१५ ते १८ वर्षांच्या आतील मुलांचे कोरोना लसीकरण देशात सुरू झाले आहे. आतापर्यंत जवळपास साडे तीन कोटी मुलांना लस देण्यात आली आहे. पण १५ वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला आहे. यासंदर्भात एक दिलासादायक माहिती कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन.के.अरोरा यांनी दिली आहे, पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

देशात १५ ते १८ वर्षांच्या आतील मुलांची संख्या जवळपास ७ कोटी ४० लाखा आहे. यापैकी ३ कोटी ४५ लाख मुलांना पहिला डोल दिला गेला आहे, अशी माहिती अरोरा यांनी दिली आहे. आता या मुलांचा दुसरा डोस २८ दिवसांनी असेल. या वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाले की त्यानंतर १२ – १४ वर्षे वयाच्या मुलांचे लसीकरण मार्चमध्ये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. देशात १२ ते १४ वर्षांच्या आतील मुलांची संख्या सुमारे साडे सात कोटी एवढी आहे.


तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीये यांनी ट्विट करुन ३ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत देशातील १५ ते १८ वयोगटातील ३ कोटी ५० हजार मुलांना लस देण्यात आल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यातील शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण झाले तर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार काय निर्णय़ घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News