कोरोनाला वेशीवर रोखणार चिंचणी गाव

Update: 2021-05-07 17:33 GMT

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखले आहे. आजपर्यंत गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. लोकांचा पुढाकार आणि एकजूट असेल तर आपण कोणत्याही प्रतिकूल काळात आपल्या गावाला सुरक्षित ठेवू शकतो हे चिंचणी या गावाने सिध्द करून दाखवले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र सामाजिक अंतर ठेवा असे आवाहन केले जात आहे. या गावचे नागरीक सामाजिक कार्यकर्ते मोहन अनपट सांगतात की...

"सामाजिक अंतर ठेवून चालणार नाही. प्रतिकूल काळात गावातील लोकांना एकमेकांची असलेली गरज पूर्ण करायची असेल आणि कोरोनाला देखील हरवायचे असेल तर शारीरिक अंतर ठेवले पाहिजे".

ही गरज ओळखून लॉकडाऊन काळात चिंचणी येथील सर्व नागरिकांच्या सर्वच गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी या गावातील कोव्हिड समितीने घेतली. याचा परिणाम म्हणजे गावातील कुणीही बाहेर पडले नाही. कुणाला ताप आला धाप लागली की, ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर द्वारे गावातच तपासणी केली जाते.

कोरोनाच्या साथीने सर्वत्र धावपळ सुरू आहे. कुणी बेडसाठी धावत आहे पण बेड मिळत नाही. या स्थितीत चिंचणी येथील स्त्रियांचे उन्हाळी पापड कुरवड्या बनवण्याचे काम सुरू आहे.

हे काम करत करत कस्तुराबाई जाधव मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगतात की

"आम्ही सर्वांनी काळजी घेतली. गावातील कुणाचा नातेवाईक वारला तरी एकानेच जायचे आणि आल्यावर देखील त्याने वेगळे बसायचे. मास्क आणि बाहेरच्या लोकांशी संपर्क टाकल्यामुळे आमच्या गावात कोरोना आला नाही. पुढे त्या हसत हसत सांगतात की कोरोनाचा आमच्या गावावर फक्त एवढाच परिणाम झाला की यावर्षी फक्त सामूहिक वाकळा शिवण्याचे काम आम्हाला करता आले नाही".

शशिकांत सावंत सांगतात की "आम्ही सुरुवातीला आरोग्य विभागाच्या वतीने गावात आरोग्य कँप घेतला यामध्ये कुणाला ताप थंडी सर्दी सारखे आजार आहेत का? हे तपासले यावर औषधोपचार केला. कोण आजारी पडलं की कुणीही लपावायच नाही आणि खासगी दवाखान्यात जायचं नाही असा नियम केला आहे".

घराघरात मास्क, सॅनीटायझरचे वाटप केले आहे.

लॉकडाऊन चा सदुपयोग करत ग्रामपंचायतीने रेन हार्वेस्टिंग ची कामे वृक्षांना श्रमदानातून आळी तयार करणे. नवीन वृक्ष लागवड करणे. गावात बसायला पार बांधणे गावातील लिकेजेस काढणे अशी कामे उरकून घेतली आहेत.

भविष्यात देखील गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये. यासाठी शंभर टक्के लसीकरण गावातच पूर्ण करण्याचे नियोजन गावकऱ्यांनी सुरू केले आहे.

Tags:    

Similar News