कोरोनाचा संसर्ग : नॉन डायबिटीक रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ

Update: 2020-07-14 01:29 GMT

कोरोनाच्या संसर्गाचा धोका हा डायबेटीस, बीपीच्या रुग्णांना जास्त असल्याचे सांगितले जाते. पण आता डायबेटीस नसलेल्या अनेकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कोरोनामुळे वाढत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला आहे.

इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या मते, मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत हा जगात दुस-या क्रमांकावर आहे. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असामान्य कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड पातळी हे मधुमेहास आमंत्रित करतात. नुकत्याच झालेल्या संशोनधानुसार आता कोरोनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याचं आढळले आहे.

रूग्णालयांमध्ये असे सुमारे ४ - ५ रुग्ण आढळत आहेत. मधुमेहाचे रुग्णदेखील केटोएसीडोसिसस सारखी समस्या घेऊन रुग्णालयात येत आहेत, अशी माहिती मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख डॉ. केदार तोरस्कर यांनी दिली आहे.

कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे Sars Cov-2 असे आहे. शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवरही हल्ला करतात.

कोरोना या विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. सार्स प्रकारातील कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. की कोरोनाव्हायरस ग्रस्त बर्याकच रुग्णांना मधुमेह नसतानाही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीत वाढली असून अशा रुग्णांना धोका असल्याचे दिसून आले आहे. साखरेची उच्च पातळी आणि केटोआसीडोसिस सारख्या समस्या घेऊन आलेल्या रुग्ण हे त्यांना कोविड पॉझिटिव्ह असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका ४१ वर्षीय महिलेला गेल्या पाच दिवसांपासून ताप येणे, घसा खवखवणे आणि अंगदुखी तसेच तीन दिवसांपासून त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्या जाणवत असल्याने रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले होते. सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवी होणे अशी इतर कोणतीच लक्षणे या महिलेमध्ये दिसून आली नाही. या महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. रुग्णाला आपत्कालीन विभागात दाखल केले तेव्हा रक्तातील साखर ५३० इतकी होती. तिचा सीरम आणि युरिन केटोन्स पॉझिटिव्ह होते. महिलेला मधुमेहाचा पुर्व इतिहास नसल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास एसीई-२ हे प्रथिन साहाय्यभूत ठरते. हे प्रथिन फुप्फुसच नव्हे तर स्वादुपिंड, लहान आतडे, मूत्रपिंडातही अस्तित्वात असते.

पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याचा विपरित परिणाम होतो, अशी माहिती डॉ. केदार तोरस्कर यांनी दिली आहे. तसेच कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्याने ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जातो.

मधुमेह नसलेल्या रूग्णांमध्येही मृत्यू ओढावण्याची दाट शक्यता आहे. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब धोकादायक ठरतो आहे, असंह डॉक्टरांचे म्हणणे आहे. ६० वर्षावरील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर जगभरात या वयोगटातील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

Similar News