मुंबईत वायुगळती? काही भागांमध्ये दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास

Update: 2020-06-07 01:27 GMT

विशाखापट्टणम इथल्या वायुगळतीची घटना ताजी असतानाच मुंबईतल्या चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात वायूगळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांनी केल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

शनिवारी रात्री १०च्या सुमारास हा प्रकार घडला. तातडीने अग्निशमन दलामार्फत या दुर्गंधीचा उगम कुठून झाला याचा शोध घेण्यात आला. यानंतर दोन तासांनी परिस्थिती नियंत्रणात असून आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेमार्फत देण्यात आली.

वासाचा उगम शोधण्यात येत असून एकूण १७ अग्निशमन संयंत्रे तैनात केल्याचेही सांगण्यात आले. पण तोपर्यंत दुर्गंधी कुठून येत आहे याचा शोध लागला नव्हता. दरम्यान कुणीही घाबरून जाऊ नये दुर्गंधीचा खूप त्रास होत असल्यास ओला रुमाल नाकाला लावण्याचे आवाहन महापालिकेने केले. पण हा दुर्गंध कुठून येत आहे आणि कशामुळे हे झाले याची माहिती बीएमसीने दिलेली नाही.

Similar News