मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्यामुळे भेटीगाठी लांबल्या

Update: 2022-06-22 10:04 GMT

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनाम्याची घोषणा करु शकतात अशी चर्चा आहे. पण आता मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतही ते ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांनी नियमित कामकाजा विषयी चर्चा केली, त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नव्हते,अशी माहिती काही मंत्र्यांनी दिली आहे. पण दुसरीकडे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि इतर नेते मुख्यमंत्र्यांना भेटू शकणार नाहीयेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते कमलनाथ मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी सर्व काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. तिकडे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांशी चर्चा केली. कमलनाथ यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. पण मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्यामुळे कमलनाथ, शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटता आलेले नाही.

एकीकडे शिवसेना आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या संकटात सापडलेली असताना मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांना भेटता येत नसल्याने पुढील रणनीतीबाबत कोणताही निर्णय़ घेता येत नसल्याची चर्चा आहे.

Tags:    

Similar News