सामान्यांची दिवाळी होणार गोड, मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय

Update: 2022-10-04 10:55 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यापासून अनेक जनहिताचे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सामान्यांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहेत.

1) देशात महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप असल्याचे चित्र आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेणार आहेत. या निर्णयानुसार राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटूंबांना म्हणजेच 7 कोटी नागरिकांना दिवाळीनिमीत्त रवा, चना डाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलोचे पॅकेज) केवळ शंभर रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. हा निर्णय मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार आहेत.

2) याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाणार आहे.

3) पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचाही निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत गृह विभाग घेणार आहे.

4) नगरविकास विभागाकडून नागपुर मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती देण्यासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

5) जलसंपदा विभागाकडून भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार असल्याचे आणि योजनेसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्याबाबत आणि खर्चास सुधारित मान्यता या बैठकीत देणार असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.

Tags:    

Similar News