गृहमंत्रीच असंवेदनशील, पोलिस त्यांचीच री ओढताहेत !! चित्रा वाघ यांचा घणाघात !!

Update: 2020-02-20 03:45 GMT

राज्याचे गृहमंत्री स्वत:च जर महिला अत्याचारांच्या प्रकरणात पिडीतेचंच खच्चीकरण करणारी आक्षेपार्ह विधानं करत असतील तर पोलिस अजून वेगळं काय वागणार आहेत, असा सवाल करीत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांवर हल्ला चढवीत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.

सिल्लोडमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या एका ताज्या घटनेत दोघा मायलेकींची हत्या करून त्यांची प्रेतं विहिरीत ढकलून देण्यात आली आहेत. मॅक्समहाराष्ट्र ने या घटनेचं सविस्तर वृत्तांकन केलं. ट्विटरवर त्याच संबंधित बातमीखाली प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना टॅग करून दिलेल्या प्रतिक्रियेत चित्रा वाघ म्हणतात, सिल्लोड ची जळीत भगिनी मृत्यूशी झुंज देत होती त्यावेळी आरोपीचे व महिलेचे काही संबंधातूनही घटना झाली, या आशयाचं अतिशय बेजबाबदार वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. या मानसिकतेतूनचं तर विकृतांना बळ मिळतं. नेहमीचं महिला/मुलींबाबत घटना घडली की आधी तातडीने तपास न करता पहिल्यांदा महिलांनाच आरोपीच्या कोठडीत उभं केलं जातं. हिचंच काही असेल, गेली असेल कोणासोबत वगैरे. गृहमंत्रीचं अशा पद्धतीनं बोलत आणि विचार करत असतील तर त्यांच्या खात्यातील पोलिसांकडून वेगळी काय अपेक्षा ?

दरम्यान, सिल्लोडमधील मायलेकींच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर बलात्कार झाला होता किंवा नव्हता, हे वैद्यकीय तपासणीतून निश्चित होणं कठीण झालं आहे. दोघींचे मृतदेह तीन दिवस पाण्यात सडल्यामुळे कुठल्याही निष्कर्षावर येणं डाॅक्टरांसाठी जिकिरीचं होऊन बसलंय. दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले असून पोलिस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

हैदराबादप्रमाणे याही प्रकरणात पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध घेण्यात उदासीनता दाखवली. एक महिला लहान मुलीसह गायब आहे, ही त्यांच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार पोलिसांना गंभीर वाटली नाही. इतकंच नव्हे तर विहिरीतून प्रेतं बाहेर काढण्यापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत वाहून आणेपर्यंत पोलिसांनी हात वर केलेले होते, असा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी पोलिसांच्या असंवेदनशीलतेसाठी थेट गृहमंत्र्यांनाच जबाबदार धरल्याने आता चेंडू सरकारकडे आला आहे.

Similar News