आज देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Update: 2021-09-20 04:43 GMT

मुंबई  : आज देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, दक्षिण राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबई क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या खाडीवर चक्रवाती परिसंचरण विकसित होणार असून ते जसंजसं गतीमान होईल, तस तसं राज्यातील विविध भागात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी विदर्भातील काही भागात पावसाला सुरूवात होईल. तर राज्याच्या उत्तर भागात प्रामुख्याने पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर पालघर, ठाणे आणि मुंबईच्या काही भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात आजपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत उद्या म्हणजेच दि 21 व 22 सप्टेंबरला काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत आजपासून तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तिकडे पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून , तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News