बेरोजगारांना मंत्रीमहोदयांचे दारुविक्रीचे धडे...

Update: 2020-02-13 13:06 GMT

संसाराची राखरांगोळी करणाऱ्या दारूवर बंदी घालावी म्हणून अनेक ठिकाणी महिला तसेच विविध संघटना रस्त्यावर उतरत असताना शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुण बेरोजगार युवकांसाठी असलेल्या जाहीर कार्यक्रमात दारू व्यवसायाचे समर्थन केले आहे. हॉटेलचा व्यवसाय बिअरबार, परमिट रुमची जोड दिल्याशिवाय चालत नाही, असा आपला स्वतःचा अनुभव असल्याचे धक्कादायक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2893970627313374/?t=2

जळगाव जिल्हा प्रशासनानं पंतप्रधान मुद्रा योजना जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, गुलाबराव पाटील यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बेरोजगार युवक तसेच विद्यार्थ्यांसमोरच दारू व्यवसायाचे समर्थन केले.

गुलाबराव पाटील यांनी भाषणात स्वतःचे अनुभव सांगितले. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला भाड्याने शाकाहारी हॉटेल सुरू केले. मात्र, ते हॉटेल चालत नव्हते. म्हणून मी ते हॉटेल मांसाहारी केले. तरीही मटण उरलं की ते दुसऱ्या दिवशी खपेना. मग शेवटी मी ते हॉटेल बिअरबार, परमिटरूम केले. तेव्हा हॉटेल जोरात चालायला लागले. हॉटेल मांसाहारी होते तेव्हा एका दिवसाचा गल्ला 4 हजार रुपये होता. मात्र, ते हॉटेल परमिटरूम झाल्यावर एका दिवसाचा गल्ला 20 हजार रुपयांवर गेला. हॉटेल व्यवसाय सुरू केल्यावर ते चालत नव्हते. तेव्हा आपण या व्यवसायात फसलो, असे मला वाटायचं.

त्यावेळी आपण तर राजकारणात आहोत, दारूचा व्यवसाय कसा सुरू करायचा? हा विचार मनात यायचा. पण जर आपण हा व्यवसाय केला नाही तर कुणीतरी दुसरा हा व्यवसाय करेलच म्हणून मी परमिट रूम सुरू करण्याचा निर्णय घेतला. परमिट रूम सुरू केल्यामुळे मला महिन्याला 50 ते 60 हजार रुपये मिळायला लागले. हा माझा स्वतःचा अनुभव असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

जाहीर कार्यक्रमात एका मंत्र्याने तरुणांना दारू विक्रीचे धडे दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Similar News