मुंबईत बिल्डराज, रहिवाशांना घाबरवण्यासाठी उभे केले बाऊन्सर्स

Update: 2021-01-04 04:19 GMT

बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक हा तसा नेहमीचाच प्रकार असला तरी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागामध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. येथे नुकत्याच बांधण्यात आलेल्या एका सोसायटीमधील रहिवाशांनी बिल्डरने सोसायटीचे रजिस्ट्रेशन न करुन दिल्याने स्वतः सोसायटीची नोंदणी करुन घेतली, पण त्यामुळे आता बिल्डरने सोसायटीच्या गेटवर बाऊन्सर्स आणून उभे केले आहेत असा आरोप करत रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामुळे मुंबईमध्ये बिल्डर राज सुरू आहे का, मुंबई पोलीस कुठे आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकरण काय?

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागामध्ये सिग्निया पर्ल नावाची एक सोसायटी आहे. ही बिल्डिंग Startlight systems (I) LLP या कंपनीने बांधली. पण ४ वर्ष पूर्ण होऊनही बिल्डरने सोसायटीची नोंदणी न केल्याने इथल्या रहिवाशांनी सोसायटीची नोंदणी केली. पण या नोंदणीला विरोध करत बिल्डरने हे काम रोखण्याचे अनेक प्रयत्न केले पण डेप्युटी रजिस्ट्रार यांनी सोसायटीच्या बाजूने निकाल देत सोसायटीला मान्यता दिली, असे त्या रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकारानंतर बिल्डरने वेगवेगळ्या माध्यमातून रहिवाशांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप रहिवाशांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे.

बिल्डरने प्रोपर्टी टॅक्स तसं सभासदांकडून जमा केलेल्या इतर पैशांचा योग्य त्या ठिकाणी विनियोग केलेला नाही असा आरोपही या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. दरम्यान सोसायटीने हाउसकीपिंग आणि सिक्युरिटीचे कंत्राट बिल्डरकडील एजन्सीकडून काढून दुसऱ्या एजन्सीला दिल्यानंतर आधीच्या एजन्सीतील कामगार हे सोसायटीच्या गेटवरच ठाण मांडून बसलेले आहेत. यानंतर बिल्डरने रविवारी सकाळी काही बाउन्सर त्या ठिकाणी आणून बसवलेले आहेत. हे बाऊन्सर रहिवाशांना धमकावण्यासाठी आणले आहेत का असा सवाल या सोसायटीचे अध्यक्ष अमरपाल सेठी यांनी केलेला आहे.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने बिल्डरची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही.

पोलिसांचे म्हणणे काय?

याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वरिष्ठांशी बोला असे सांगितले.

Tags:    

Similar News