देशभरात भाजपची पिछेहाट

Update: 2020-02-11 09:01 GMT

२०१९ हे वर्ष संपता संपता भाजपने झारखंड राज्य गमावलं. भाजपच्या मुख्यमंत्र्याला आपली जागाही गमावावी लागली. २०१९ मध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपच्या हातून महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य गेलं. हरियाणामध्येही भाजपला लोकदलाला सोबत घेऊन सत्ता चालवण्याची वेळ आली.

आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला सर्व ताकद पणाला लावूनही भाजपला दिल्ली विधानसभा जिंकता आली नाही. लोकसभेत एवढं मोठ यश मिळूनही भाजप राज्यामागून राज्य गमावत चालला आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत २०२० मध्ये देशाचा राजकीय कॅनवॉस पूर्णपणे बदलला आहे.

सध्या दिल्लीसह देशातील १२ राज्यात विरोधी पक्षांची सरकारं सत्तेवर आहेत. तर एनडीएकडे उरली आहेत केवळ १६ राज्य. महत्वाचं म्हणजे उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक सोडल्यास दुसरं मोठं राज्य भाजपकडे नाही. २०१७ मध्ये भाजप यशाच्या शिखरावर होता. यावर्षी भाजप आणि मित्र पक्षांकडे १९ राज्यांचा कारभार होता. मात्र गेल्या दोन वर्षात भाजपने एकापाठोपाठ सात राज्य गमावली आहेत.

दिल्लीतला आठवा पराभवही ठरलाय. २०१७ नंतर भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये, पंजाब ही महत्वाची राज्य गमावली. तर आंध्र प्रदेशमध्येही वायएसआर काँग्रेसची सत्ता आली. ओडिशामध्ये जोर लावूनही भाजपला काही साध्य करता आलं नाही.

वर्ष २०१७

भाजप आणि मित्र पक्षांची १९ राज्यात सरकारं

देशाचा ७५ टक्के भूभाग व्यापणारी राज्य भाजपच्या ताब्यात

तर देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७२ टक्के लोकसंख्या असलेली राज्य भाजपकडे

वर्ष २०२०

१६ राज्यात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता

देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्के लोकसंख्या असलेल्या राज्यात भाजपची सत्ता

देशाचा ३५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता

भाजपनं ही राज्य गमावली- दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र,पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान

भाजपनं ही राज्य कमावली - कर्नाटक, त्रिपूरा, मिझोरम, मेघालय

Similar News