'सत्य हे सत्यच असतं' ; जलयुक्त शिवारला मिळालेल्या क्लीनचिटबाबत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Update: 2021-10-27 12:04 GMT

अहमदनगर : राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी केली. त्याचा अहवाल आला असून त्यामध्ये दोष नसल्याचे आढळून आले. याबाबत बोलताना सत्य हे सत्यच असतं अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेला मिळालेल्या क्लीन चिटचे स्वागत केले.

सोबतच त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील सामान्य शेतकरी देखील म्हणत होता की, जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीतील पाण्याचा साठा वाढला आहे.कूपनलिका असेल, विहिरी असेल त्यांचा पाणीसाठा वाढला आहे, जिथे आम्ही एक पीक घेत होतो तिथे दोन- दोन, तीन- तीन पीक घेतोय, असं शेतकऱ्यांनी सांगितले असताना देखील केवळ राजकारणाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावली गेली.मात्र, दूध का दूध पाणी का पाणी झालं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

सोबतच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांच्या आरोपांचे देखील जलयुक्त प्रमाणेच होईल, सोबतच भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, राज्यातील जनतेला सर्व समजतं, कोण ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्यांची पाठराखण करत, वकिली करत. जनता हे सर्व पाहत आहे, मात्र, जनता निवडणूकीच्यावेळी ज्याला त्याला जागा दाखवून देत असते. देगलूरच्या निवडणूकीतून त्यांना समजेल असं पाटील म्हणाले.

Tags:    

Similar News