मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्यासाठी पुरग्रस्त कोल्हापूरात भाजपने वाटले पत्रकं

Update: 2019-08-13 13:18 GMT

राज्यात पूर ओसरतोय पण पुरग्रस्तांसमोर रोगराईची चिंता तसेच घर आणि मूलभूत गरजांची जुळवाजुळव करण्याचा संघर्ष सुरु आहे. अशा बिकट परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचे आपल्या पूरग्रस्त बहिणींसाठी बंधुप्रेम उफाळून आल्याचे दिसतंय. कोल्हापुरातील महिलांना भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे राखी विकत घेऊन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूरस्थितीत भाजपकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबवल्या जाणाऱ्या या संधीसाधू जाहिरातबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात भाजपच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त ‘सुवर्णबंध महोत्सव’ सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत भाजप सत्तेत आल्यापासून विविध योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना राज्यातून २१ लाख राख्या पाठविण्याचा निर्धार पक्षाने केला होता.

प्रत्येक मतदारसंघातील योजना लाभार्थी महिलेने मुख्यमंत्र्यांसाठी एक राखी पाठवावी म्हणून भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांची सही असलेले पत्र, योजनांचे माहितीपत्रक आणि पाकिटे सगळीकडे पाठविण्यात आली आहेत. त्यातील काही पाकिटे सोमवारी कोल्हापुरातल्या शाहूनगर वड्डवाडी येथील महिलांना मिळाली. आता हक्काच्या योजनांचा लाभ घेतला म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विकत घेऊन राखी पाठवायची की, आपला मोडका संसार उभा करायचा हा प्रश्न या महिलांना पडलाय.

Similar News