उदय सामंत यांना हटवण्याची मागणी, सामंत यांचं उत्तर

Update: 2020-07-16 01:55 GMT

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याने त्यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले असून यामध्ये उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या शिफारशीनुसार घेतल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसंच उदय सामंत विद्यापीठांच्या स्वायत्त कारभारात हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे. तसंच केवळ राजकीय फायद्यासाठी सामंत हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान अतुल भातखळकर यांच्या या मागणीला उदय सामंत या ट्विटरवरुन उत्तर दिले आहे.

“अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही.. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार.. अतुलजींना शुभेच्छा...”

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्य सरकार विरुद्ध UGC असा वाद सुरू आहे. UGCने अंतिम वर्षाच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत घेणे बंधनकारक केले आहे. तर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या संकटकाळात सध्या तरी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपनं सरकारवर जोरदारी टीका केली आहे.

Similar News