कोरोनाच्या संकटात देशातील पहिली निवडणूक, बिहारमध्ये ३ टप्प्यात मतदान

Update: 2020-09-25 10:41 GMT

गेल्या ६ महिन्यांपासून संपूर्ण देश ठप्प केलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता या संकटकाळात पहिल्या मोठ्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला, ३ नोव्हेंबरला दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांसाठी मतदान होईल. तर १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. लाखो सॅनिटायजर्स आणि पीपीई किट, सुमारे २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली, असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

सुशांत सिहं राजपूत प्रकरण, कृषी विधेयकं, ढासळलेली अर्थव्यवस्य़ा या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. भाजप आणि जेडीयू यांची युती असल्याने विरोधक या निवडणुकीत कशी रणनीती आखतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केलेले आहे. या निवडणुकीत सुसांत सिंग राजपूतच्या अनैसर्गिक मृत्यूचा मुद्दा भाजपतर्फे आधीच प्रचाराता आणला गेला आहे.

Similar News